न्यूयॉर्क : अमेरिकेतील अल्बानी (Albany) शहरात लागलेल्या भीषण आगीत हैदराबादची २४ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी सहजा रेड्डी उदुमला हिचा मृत्यू झाला. ही घटना ४ डिसेंबर रोजी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सहजा रात्रीची शिफ्ट करून घरी परतली होती. सकाळी अंदाजे ११.४० वाजता इमारतीला अचानक आग लागली. आगीचे स्वरूप गंभीर असल्यामुळे काही क्षणातच आग संपूर्ण घरात पसरली. अग्निशमन दलाने सहजाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले, मात्र तिच्या शरीराचा अंदाजे ९० टक्के भाग भाजल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

सहजा रेड्डी ही युनिव्हर्सिटी ॲट अल्बानी येथे मास्टर्स इन सायबर सिक्युरिटीचे शिक्षण घेत होती. तिचे कुटुंबीय मूळचे हैदराबाद, तेलंगणा येथील असून, या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तिच्या पार्थिवाला भारतात आणण्यासाठी सध्या निधी संकलन सुरू असून, न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने या घटनेची दखल घेत कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन दिले आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून स्थानिक अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे.