मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीची घोषणा झाली असली, तरी उमेदवारी वाटपाच्या प्रक्रियेत पक्षात मोठा तणाव पाहायला मिळाला. बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर न करता थेट ‘मातोश्री’वर एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे काही ठिकाणी उत्साह दिसला, तर अनेक ठिकाणी नाराजी आणि मतभेद उफाळून आले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवानेते आदित्य ठाकरे यांनी स्वतः उमेदवारी प्रक्रियेवर लक्ष ठेवले. शनिवारपासून सुरू झालेल्या वाटपादरम्यान मातोश्रीवर इच्छुक उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. अनेक प्रभागांतील तिढे सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुख व स्थानिक नेत्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या.
उमेदवारी मिळालेल्यांनी आनंद व्यक्त केला, मात्र वंचित राहिलेल्यांमध्ये असंतोष पसरला. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची उमेदवारी अखेर प्रभाग क्रमांक १९९ मधून निश्चित झाली. त्याच भागात इतर पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनाही उमेदवारी मिळाल्याने घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
प्रभाग क्रमांक ९५ मधील उमेदवारीवरून आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार अनिल परब यांच्यात तीव्र मतभेद झाले. अखेर उद्धव ठाकरे यांनी सरदेसाई यांच्या बाजूने निर्णय दिल्याने अनिल परब नाराज होऊन बैठक अर्धवट सोडून बाहेर पडल्याची चर्चा आहे.
सोमवार संध्याकाळपर्यंत सुमारे १२५ उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्यात आले. अंतिम दिवशी नेमक्या किती जागांवर ठाकरे गट निवडणूक लढवणार, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, भाजप आणि शिंदे गटातही उमेदवारीवरून अंतर्गत हालचाली सुरू असून पुढील काही दिवसांत नाराजीचा सूर अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.