कोल्हापूर : गुजरातमधील वनतारा येथे हलवण्यात आलेल्या नांदणी मठातील माधुरी हत्तिणीला पुन्हा मठाच्या जागेत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या सुनावणीत पुनर्वसन केंद्र उभारण्यासाठी प्रारंभिक पूर्वपरवानग्या देण्यात आल्या. त्यामुळे मठाच्या जागेत पुनर्वसन केंद्राच्या कामाला वेग मिळणार आहे.

मुंबई येथे निवृत्त न्यायमूर्ती दीपक वर्मा आणि डॉ. मनोहरन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीत नांदणी मठाच्या वतीने वकील मनोज पाटील यांनी बाजू मांडली. सुनावणी सकारात्मक ठरल्याचे सांगत, या निर्णयामुळे माधुरी हत्तिणीच्या पुनर्वसनाचा मार्ग स्पष्ट झाल्याचे त्यांनी नमूद केले.

उच्चस्तरीय समितीच्या आदेशानुसार डॉ. मनोहरन यांच्या अध्यक्षतेखालील तपासणी समितीने सादर केलेल्या अहवालात माधुरी हत्तिणीचे आरोग्य समाधानकारक असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, हत्तिणीची सहा महिन्यांनंतर पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, माधुरी हत्तिणी आणि नांदणी मठातील माहुत यांच्यातील भावनिक नातेसंबंधाचाही न्यायालयाने विचार केला आहे.

दरम्यान, नांदणी मठ संस्थान, वनतारा व्यवस्थापन आणि राज्य सरकार यांनी मठाच्या मालकीच्या जागेत पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव समितीसमोर सादर केला. या प्रस्तावाला प्रारंभिक बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मठ संस्थानाने महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित शासकीय यंत्रणांच्या सर्व आवश्यक परवानग्या सादर केल्या असून, समितीने त्याची दखल घेत निर्णय दिला.

पुनर्वसन केंद्राला औपचारिक पूर्वपरवानगी

उच्चस्तरीय समितीने निविदा प्रक्रिया, अंदाजपत्रक सादरीकरणासह प्रारंभिक सात टप्प्यांना मंजुरी दिली आहे. या पुनर्वसन केंद्रासाठी सुमारे १२ कोटी रुपयांचा खर्च आणि ठरावीक कालावधीचा आराखडा सादर करण्यात आला असून, काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे माधुरी हत्तिणीच्या नांदणी मठातील पुनर्वसनाच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे. पुनर्वसन केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर माधुरी हत्तिणीला तिच्या मूळ ठिकाणी परत आणण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार असून, या घडामोडीकडे प्राणीप्रेमी, मठाचे भाविक आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.