नवी मुंबई :
२५ डिसेंबर २०२५ हा दिवस नवी मुंबईच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या व्यावसायिक उड्डाणाने यशस्वी झेप घेतली आणि शहराने एक ऐतिहासिक क्षण अनुभवला. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर नवी मुंबईला स्वतःचा आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाल्याने नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
विमानतळ सुरू होताच पहिल्याच दिवशी उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. हजारो प्रवाशांनी या ऐतिहासिक उड्डाणाचे साक्षीदार होण्यासाठी विमानतळावर हजेरी लावली. प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद, अभिमान आणि कुतूहल स्पष्टपणे दिसून येत होते. विमानतळ परिसरात जल्लोष आणि उत्साहाचे दृश्य पाहायला मिळाले.
विमानतळ प्रशासनाने पहिल्याच दिवशी सर्व यंत्रणा सुरळीत राबवल्या. चेक-इन प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली. सुरक्षा तपासणी काटेकोर आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. ग्राउंड स्टाफने बोर्डिंग प्रक्रिया विनाविलंब पूर्ण केली, तर बॅगेज हाताळणी यंत्रणेत कोणतीही अडचण आली नाही. पहिल्या दिवसाची कसोटी विमानतळ प्रशासनाने यशस्वीरीत्या पार केली.
वाहतुकीच्या व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. वाहतूक पोलिसांनी अटल सेतू, सायन–पनवेल महामार्ग आणि पामबीच मार्गावर विशेष नियोजन केले. सिडको आणि संबंधित यंत्रणांनी स्वतंत्र लेन, दिशादर्शक फलक आणि अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले. त्यामुळे मोठी गर्दी असूनही वाहतूक कोंडी टळली.
इंडिगो, एअर इंडिया एक्स्प्रेस, आकासा एअर आणि स्टार एअर या विमान कंपन्यांनी पहिल्याच दिवशी सेवा सुरू केली. इंडिगोच्या ६ई ४६० या विमानाने सकाळी ८ वाजता बंगळुरूहून नवी मुंबईत पहिले आगमन केले. या विमानाला पारंपरिक वॉटर कॅनन सलामी देण्यात आली. त्यानंतर इंडिगोच्या ६ई ८८२ या विमानाने सकाळी ८.४० वाजता हैदराबादसाठी पहिले प्रस्थान केले.
पहिल्याच दिवशी विमानतळावरून एकूण ४८ उड्डाणांची वाहतूक हाताळण्यात आली. सुमारे ४ हजार प्रवाशांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास केला. आधुनिक टर्मिनल, स्वच्छता, सोयी-सुविधा आणि नियोजनाबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.
टर्मिनल परिसरात प्रवाशांनी मोठ्या उत्साहात छायाचित्रे आणि व्हिडीओ काढले. अनेकांनी “दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ” असे फलक हातात घेतले. विमानतळ कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचे स्वागत करत काहींना स्मृतिचिन्हे देऊन या ऐतिहासिक दिवसाची आठवण जपली.
प्रकल्पग्रस्त नागरिकांसाठी हा क्षण विशेष भावनिक ठरला. अनेक नागरिकांनी पहिल्या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी आधीच तिकीट आरक्षण केले होते. नवी मुंबई–गोवा, नवी मुंबई–हैदराबाद आणि दिल्ली–नवी मुंबई या मार्गांवर विशेष उत्साह दिसून आला. काही नागरिक पारंपरिक आगरी–कोळी वेशभूषेत सहभागी झाले होते आणि “दिबां”चे पोस्टर झळकावत आनंद व्यक्त करत होते.
पहिले उडणारे विमान पाहण्यासाठी कळंबोली येथील जेएनपीए मार्गावरही नागरिकांची गर्दी झाली होती. नवी मुंबई शहराने या ऐतिहासिक क्षणाचे जल्लोषात स्वागत केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे शहराच्या आर्थिक, औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवे पंख मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.