Dainik Sahyadri

ठाणे : प्रभाग क्रमांक १५ मध्ये भाजपकडून तिकीट विक्रीचा आरोप; माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

BJP and thane

BJP and thane

ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ मध्ये राजकीय वातावरण तापले असून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजपने या प्रभागातील उमेदवारी तब्बल २.५ कोटी रुपयांना विकल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे माजी नगरसेवक राजकुमार यादव यांनी केला आहे. या आरोपामुळे ठाण्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

राजकुमार यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पक्षात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आर्थिक व्यवहारांच्या आधारे उमेदवारी दिली जात आहे. “भाजपमध्ये संघटनात्मक काम, जनतेशी असलेला संपर्क आणि अनुभव यांना कोणतेही महत्त्व उरलेले नाही. पैसे देऊ शकणाऱ्यालाच उमेदवारी दिली जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या माजी नगरसेविका वर्षा पाटील आणि शिवसेनेचे समाजसेवक महेंद्र सोडरी यांनीही भाजपवर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. ठाण्यात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत या तिघांचा पक्षप्रवेश पार पडला.

प्रवेशावेळी बोलताना वर्षा पाटील यांनी सांगितले की, “मी भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम केले. मात्र निवडणुकीच्या वेळी अचानक निर्णय बदलले जातात, कार्यकर्त्यांचा अपमान होतो. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.”

महेंद्र सोडरी यांनीही भाजपवर टीका करत सांगितले की, “समाजसेवा आणि जनतेसाठी काम करण्याऐवजी काही पक्षांमध्ये फक्त सत्तेचे आणि पैशाचे राजकारण सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला सन्मान मिळतो, म्हणूनच हा निर्णय घेतला.”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या प्रवेशाचे स्वागत करत भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका केली. “भाजपमधील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येत आहे. पैसे घेऊन तिकीट देण्याचे आरोप गंभीर आहेत. ठाण्यात भाजपची पकड सैल होत असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत,” असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला.

दरम्यान, भाजपकडून या आरोपांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र प्रभाग क्रमांक १५ मधील या घडामोडींमुळे ठाणे महापालिका निवडणूक आणखी चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षांतर आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे येत्या काळात ठाण्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

(या बातमीत नमूद केलेले आरोप सत्य अथवा सिद्ध झालेले असल्याचा आम्ही कोणताही दावा करत नाही. संबंधित व्यक्तींनी केलेल्या वक्तव्ये व आरोपांवर आधारित ही माहिती आहे. या आरोपांच्या अचूकतेची किंवा सत्यतेची जबाबदारी आम्ही घेत नाही. ही बातमी कोणत्याही आरोपांची पुष्टी करणारी समजू नये.)

Exit mobile version