गाझियाबाद शहराने धक्कादायक घटना घडली आहे . तीन सख्या बहिणींनी ‘कोरियन लव्ह गेम’चा टास्क स्वीकारून नवव्या मजल्यावरून उडी मारून स्वतःचे जीवन संपवले. या घटनेने समाजाला हादरवले आणि मुलांमधील वाढत्या मोबाईल व्यसनाचा गंभीर प्रश्न पुन्हा समाजासमोर उभा राहिला आहे . तपास यंत्रणांनी मुलींची डायरी ताब्यात घेतली आणि त्यात मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक ताण वाढल्याचे स्पष्ट झाले.
तज्ज्ञांनी या घटनेला एकट्या कुटुंबाचा प्रश्न मानला नाही, तर व्यापक सामाजिक समस्या मानली. वाढत्या डिजिटल प्रभावामुळे मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे . पालकांनीही या घटनेकडे दुर्लक्ष केले नाही आणि चिंता व्यक्त केली आहे.
दोन वर्षांपर्यंतच्या मुलांनी स्क्रीन पाहू नये, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट सांगितले आहे. मात्र भारतात ६१ टक्के मुले दोन वर्षांपूर्वीच स्क्रीन पाहू लागली आहेत . हा आकडा म्हणजे धोक्याचा इशारा आहे असे तज्ज्ञांना वाटते . ज्या मुलांचा स्क्रीनटाईम चार तासांपेक्षा जास्त होता, त्यांच्यात २६ टक्के अधिक नैराश्य आढळले हे संशोधनात दिसून आले आहे.
पन्नास टक्क्यांहून अधिक किशोरवयीन मुलांनी दररोज चार तासांपेक्षा जास्त वेळ स्क्रीनसमोर घालवला. या सवयीमुळे त्यांच्यात स्थूलपणा वाढला, चिडचिडेपणा निर्माण झाला आणि झोपेच्या समस्या वाढल्या. डॉक्टरांनी या स्थितीला ‘डिजिटल ताण’ असे नाव दिले.
डिजिटल तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून राहिल्यामुळे ‘जनरेशन जी’ म्हणजे १५ ते २७ वयोगटातील तरुणांचा बुद्ध्यांक त्यांच्या पालकांच्या पिढीपेक्षा कमी झाला. असा न्यूरो शास्त्रज्ञ डॉ. जरेड कोनी हॉरवॉक यांनी संशोधनाच्या आधारे निष्कर्ष मांडला.
मुले अभ्यासासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी लगेच गुगल किंवा एआयचा वापर करू लागली आहेत. त्यामुळे त्यांची स्वतः विचार करण्याची क्षमता कमी होते. समस्या सोडवण्याची कौशल्येही कमजोर होते. शिक्षकांनीही वर्गात विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत घट झाल्याचे निरीक्षण केले.
मुलांचे रडणे थांबवण्यासाठी त्यांच्या हातात लगेच स्मार्टफोन देऊ नका, असा सल्ला शिक्षण तज्ज्ञांनी पालकांना दिला. अशा सवयीमुळे मुले हळूहळू मोबाईलच्या आहारी जातात.
तज्ज्ञांनी पालकांना मुलांसोबत जास्त वेळ घालवण्याचा सल्ला दिला. त्यांच्याशी संवाद साधा, खेळा आणि त्यांच्या भावनांकडे लक्ष द्या, असे सांगितले. शिस्तीबरोबर प्रेम आणि समजूतदारपणा गरजेचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकार, शाळा आणि पालक यांनी एकत्र येऊन उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत मांडले गेले. डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिकवणे गरजेचे ठरले. मुलांचे मानसिक आरोग्य सुरक्षित ठेवणे हे आता समाजासमोरील मोठे आव्हान बनले आहे.
पालकांनी करावयाच्या उपाययोजना –
१) दररोज ठराविक वेळच मोबाईल/टीव्ही वापराची परवानगी द्या. जेवणाच्या वेळी आणि झोपण्यापूर्वी स्क्रीन पूर्णपणे बंद ठेवा.
२) स्वतः आदर्श बना -पालक स्वतः सतत मोबाईल वापरत असतील, तर मुलंही तेच करतील. त्यामुळे कुटुंबात “नो-फोन टाइम” ठेवा.
३) मोबाईल हे बक्षीस किंवा शांत करण्याचे साधन बनवू नका.मूल रडले की लगेच फोन देणे टाळा.त्याऐवजी बोलून समजावून सांगा किंवा दुसऱ्या कृतीत गुंतवा.
४) मुलांना रोज किमान १ तास बाहेर खेळायला पाठवा.खेळ, सायकलिंग, योग, किंवा निसर्गात वेळ घालवायला प्रोत्साहन द्या.
५) मुलांशी रोज संवाद साधा.त्यांचे विचार, भीती आणि समस्या शांतपणे ऐका.
६) अभ्यासासाठी स्वतंत्र वेळ आणि जागा ठरवा. मोबाईलपासून दूर असलेली शांत जागा अभ्यासासाठी ठेवा.
७) इंटरनेटवर काय सुरक्षित आहे आणि काय धोकादायक आहे, हे मुलांना समजावून सांगा.ऑनलाईन गेम्स, चॅलेंजेस, अनोळखी लोकांपासून सावध करा.
८) रात्री ठराविक वेळी झोपण्याची सवय लावा.झोपण्याच्या किमान १ तास आधी स्क्रीन बंद.
९) रोज २०–३० मिनिटे पुस्तक वाचायला प्रोत्साहन द्या.
१०) गरज असल्यास तज्ज्ञांची मदत घ्या.
११)मूल सतत चिडचिड करत असेल, एकटे राहू लागले असेल किंवा जास्त उदास वाटत असेल, तर बालमानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.