नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) या क्षेत्रात भारताने ऐतिहासिक कामगिरी करत जागतिक क्रमवारीत थेट तिसरे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षी भारत सातव्या क्रमांकावर होता. मात्र यंदा चार स्थानांची मोठी झेप घेत भारताने दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि ब्रिटनसारख्या प्रगत देशांना मागे टाकले आहे.
ही जागतिक क्रमवारी संशोधन व विकास, कुशल मनुष्यबळ, तंत्रज्ञानातील गुंतवणूक, पायाभूत सुविधा, नवोन्मेष, स्टार्टअप इकोसिस्टीम आणि धोरणात्मक तयारी अशा सात प्रमुख निकषांच्या आधारे ठरवण्यात आली आहे. या सर्वच बाबींमध्ये भारताची कामगिरी लक्षणीयरीत्या सुधारली असून एआय क्षेत्रातील भारताची वाढती ताकद अधोरेखित झाली आहे.
या यादीत भारताला एकूण २१.५९ गुण मिळाले आहेत. एआय संशोधन, डिजिटल सेवा आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून भारत जागतिक एआय व्यवस्थेत वेगाने आपले स्थान मजबूत करत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
विशेष म्हणजे २०२३ मध्ये भारतात एआय कौशल्य असलेल्या व्यक्तींना रोजगार देण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एकूण भरतीपैकी सुमारे १६.८ टक्के नियुक्त्या एआयशी संबंधित कौशल्य असलेल्या उमेदवारांच्या झाल्या आहेत. त्यामुळे एआय क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे.
जागतिक क्रमवारीत अमेरिका अव्वल स्थानावर असून तिला ७८.६० गुण मिळाले आहेत. चीन दुसऱ्या क्रमांकावर असून त्याचा स्कोअर ३६.९५ आहे. भारत २१.५९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
एआय क्षेत्रातील जागतिक क्रमवारी (गुणांसह):
अमेरिका – ७८.६०
चीन – ३६.९५
भारत – २१.५९
दक्षिण कोरिया – १७.२४
ब्रिटन – १६.६४
सिंगापूर – १६.४३
स्पेन – १६.३७
संयुक्त अरब अमिराती (यूएई) – १६.०६
भारताने मिळवलेले तिसरे स्थान हे देशासाठी मोठे यश मानले जात आहे. डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि एआय क्षेत्रातील धोरणात्मक गुंतवणुकीमुळे भारत जागतिक पातळीवर अधिक सक्षम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आगामी काळात एआय तंत्रज्ञानामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला तसेच रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
