Dainik Sahyadri

भोरच्या आदितीने नासापर्यंत घेतलेली झेप : कष्ट, संधी आणि स्वप्नांची यशोगाथा

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील देवघर या छोट्याशा गावातून थेट अमेरिकेतील नासापर्यंत पोहोचलेली आदिती पारथे आज अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अत्यंत साध्या परिस्थितीतून शिक्षण घेत असलेल्या आदितीने जिद्द, कष्ट आणि मिळालेल्या संधीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे.

आदिती पारथे ही सध्या सातवीत शिकणारी विद्यार्थिनी असून ती निगुडघर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहे. शिक्षणासाठी दररोज सात किलोमीटर अंतर पायी चालत शाळेत जाणे, ही आदितीची दिनचर्या आहे. आदितीचे आई-वडील कोंढारी येथे वास्तव्यास असून शिक्षणासाठी ती देवघरमध्ये मामा-मामीकडे राहत आहे. एसटी बस किंवा पायी प्रवास एवढेच जग पाहिलेल्या आदितीने कधी रेल्वेचा प्रवास केला नव्हता, तर विमान प्रवासाची कल्पनाही तिच्यासाठी दूरची गोष्ट होती.

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या तीन शैक्षणिक परीक्षा आदितीने यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्या. या उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे जिल्हा परिषदेकडून तिला अमेरिकेतील नासा (NASA) शैक्षणिक सहलीसाठी निवडण्यात आले. सुरुवातीला नासा म्हणजे काय, तिथे काय पाहायला मिळेल याची फारशी कल्पना आदितीला नव्हती. मात्र अमेरिकेत विमानाने जायचे आहे, एवढी माहिती समजताच आदिती आणि तिच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला.

पहिल्यांदाच विमानात बसल्यावर आदितीला वेगळाच अनुभव आला. उड्डाणावेळी कान दुखणे, गरगरणे यासारख्या अडचणींना तोंड द्यावे लागले. अमेरिकेत पोहोचल्यानंतर घरची ओढ, आई-वडिलांची आठवण तिला सतावत होती. मात्र काही दिवसांतच ती नव्या वातावरणाशी जुळवून घेऊ लागली.

नासा मुख्यालय, नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम अशा ठिकाणांना भेट देताना आदिती अक्षरशः भारावून गेली. १६६८ साली भारतात सापडलेला ‘होप डायमंड’, विविध प्रकारची विमाने, अंतराळ संशोधनाची माहिती या सर्व गोष्टी तिने प्रत्यक्ष पाहिल्या. इंग्रजी पूर्णपणे समजत नसतानाही तिने प्रत्येक क्षण अनुभवला.

दहा दिवसांच्या अमेरिकेतील वास्तव्यात स्वच्छता, शिस्त, वेळेचे महत्त्व आदितीने जवळून पाहिले. लोक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत नाहीत, वेळेचे काटेकोर पालन करतात, हे अनुभव तिच्या मनावर खोलवर ठसले.

नासा सहलीनंतर आदितीला अनेकजण शास्त्रज्ञ होण्याविषयी विचारत आहेत. मात्र आदितीचे स्वप्न वेगळे आहे. मोठेपणी आयपीएस अधिकारी होऊन देशसेवा करायची, अशी तिची ठाम इच्छा आहे. नासाच्या अनुभवामुळे आत्मविश्वास वाढल्याचे ती सांगते.

भोर तालुक्यातील एका साध्या गावातून नासापर्यंतचा आदितीचा प्रवास हा मेहनत, शिक्षण आणि संधीचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. तिची ही यशोगाथा ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारी ठरत आहे.

Exit mobile version