पुणे :
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात होणाऱ्या नियोजनबद्ध विकासकामांसाठी मंदिर ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिने भाविकांच्या दर्शनासाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. भाविकांची सुरक्षितता, भविष्यातील वाढती गर्दी आणि मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास लक्षात घेऊन हा निर्णय अंमलात आणण्यात येणार आहे.

भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने येथे वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण महिना, महाशिवरात्री आणि सण-उत्सवांच्या काळात गर्दी प्रचंड वाढते. मंदिर परिसरातील सभामंडप, पायरी मार्ग, दर्शन रांगा तसेच भाविकांच्या हालचाली अधिक सुरक्षित व सुकर करण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाची विकासकामे हाती घेतली आहेत.

जिल्हा प्रशासनाने भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. या आराखड्यातील महत्त्वाच्या टप्प्यांची अंमलबजावणी करण्यासाठीच मंदिर तात्पुरते बंद ठेवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बांधकाम काळात भाविकांची सुरक्षितता अबाधित राहावी, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.

या निर्णयाबाबत २३ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीस श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार, ग्रामस्थ आणि प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. सविस्तर चर्चेनंतर सर्वानुमते मंदिर ९ जानेवारीपासून तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, भाविकांच्या श्रद्धेचा मान राखत प्रशासनाने महाशिवरात्रीसाठी विशेष सवलत जाहीर केली आहे. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री असल्याने १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. या काळात भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध असेल.

प्रशासनाने २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. त्या काळात भीमाशंकर येथेही भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असून भविष्यातील गर्दी सुरक्षितपणे हाताळण्यासाठी आत्ताच विकासकामे पूर्ण करण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांनी स्थानिक ग्रामस्थ, ब्रह्मवृंद, गुरव पुजारी, प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांनी दर्शनासाठी कोणताही अट्टाहास करू नये, असे आवाहन केले आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंदिर विकास हा दीर्घकालीन सुरक्षितता आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. विकासकामे वेळेत आणि नियोजनबद्धरीत्या पूर्ण करण्यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

बंद कालावधीतही ब्रह्मवृंद आणि गुरव पुजारी परंपरेनुसार नित्य पूजाअर्चा आणि धार्मिक विधी नियमितपणे पार पाडणार आहेत. मात्र, थेट दर्शन पूर्णपणे बंद राहणार असून बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांव्यतिरिक्त इतर कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत विकासकामे यशस्वीरीत्या पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.