नागभीड (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली असून, अवैध सावकारांच्या जाचामुळे एका शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकण्याची वेळ आली आहे. केवळ एक लाख रुपयांचे कर्ज घेतलेल्या या शेतकऱ्याकडून सावकारांनी तब्बल ७४ लाख रुपयांची वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पीडित शेतकऱ्याचे नाव रोशन शिवदास कुळे (वय ३५, रा. मिथूर, ता. नागभीड) असे आहे. रोशन कुळे यांनी दुग्धव्यवसाय उभारण्याच्या उद्देशाने १५ ते २० गायी खरेदी केल्या होत्या. मात्र, जनावरांना लम्पी आजाराची लागण झाल्याने अनेक गायी दगावल्या आणि संपूर्ण व्यवसाय कोलमडला. आर्थिक संकटात सापडलेल्या रोशन कुळे यांनी ब्रह्मपुरी येथील काही अवैध सावकारांकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले.
कर्ज दिल्यानंतर सावकारांनी रोशन कुळे यांच्याकडून अवाजवी व्याज आकारण्यास सुरुवात केली. चार ते पाच जणांच्या टोळीने त्यांच्यावर सातत्याने तगादा लावला. पैसे न दिल्यास मारहाण, धमक्या, शिवीगाळ आणि डांबून ठेवणे असे प्रकार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
कर्ज फेडण्यासाठी रोशन कुळे यांनी प्रथम स्वतःची दुचाकी, त्यानंतर ट्रॅक्टर विकला. एवढेच नव्हे तर अखेरीस त्यांनी साडेतीन एकर शेतीही विकली. तरीसुद्धा सावकारांनी व्याज कमी न करता उलट कर्ज वाढवत ठेवले. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी पूर्णपणे हतबल झाला.
अखेरीस सावकारांच्या सततच्या छळामुळे ऑक्टोबर २०२४ मध्ये रोशन कुळे यांनी किडनी विकण्याचा टोकाचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी यूट्यूबवर माहिती शोधून परदेशात जाण्याचा मार्ग शोधला. कोलकाता येथे वैद्यकीय तपासण्या झाल्यानंतर ते कंबोडिया येथे गेले. तिथे त्यांनी आठ लाख रुपयांना किडनी विकली. मात्र, ही रक्कमही सावकारांनी बळकावल्याचा आरोप रोशन कुळे यांनी केला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत ब्रह्मपुरी पोलिसांनी सहा अवैध सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर भारतीय दंड विधानाच्या कलम १२०(ब), ३२६, ३४२, २९४, ३८७, ५०६, ३४ तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मंगळवारी रात्री सात वाजता सर्व आरोपींना अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
किशोर रामभाऊ बावनकुळे, लक्ष्मण पुंडलिक उरकुडे, प्रदीप रामभाऊ बावनकुळे, संजय विठोबा बल्लारपुरे, मनीष पुरुषोत्तम घाटबांचे आणि सत्यवान रामरतन बोरकर अशी असून, सर्व आरोपी ब्रह्मपुरी येथील रहिवासी आहेत.
चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सांगितले की, पीडित शेतकऱ्याने दिलेल्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी तपासल्या जात आहेत. सावकारांच्या छळामुळेच किडनी विकण्याची वेळ आली का, याचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी पीडित शेतकऱ्याला मदत केल्याचे सांगितले असून, न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचेही जाहीर केले आहे.
या घटनेमुळे राज्यातील अवैध सावकारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.